Friday, September 13, 2013

By Sunil Khobragade बुद्धगयेतील बौद्ध X हिंदू संघर्ष

Status Update

By Sunil Khobragade

बुद्धगयेतील बौद्ध X हिंदू संघर्ष

बुद्धगयाहे जागतिक महत्वाचे बौद्ध तीर्थस्थळ आहे. बुद्धगयेला दरवर्षी सुमारे 3 लाख परदेशी बौद्ध पर्यटक भेट देतात.मात्र येथे कायमस्वरूपी वास्तव्य करणाऱया बौद्ध धर्मीय लोकांची संख्या अत्यल्प आहे.2001 च्या जनगणनेनुसार बुद्धगयेची एकूण लोकसंख्या 30883 आहे.यापैकी बौद्धांची संख्या केवळ 1500 आहे.यामध्येही स्थानिक बौद्ध नगण्य आहेत.बुद्धगयेचे अंतरराष्ट्रीय महत्व जसजसे वाढू लागले व पर्यटकांच्या संख्येत वाढ होऊ लागली तसतसा पर्यटन व्यवसाय वाढू लागला.हॉटेल्सची संख्या वाढू लागली.समाजसेवेचा धंदा करणाऱया अशासकीय संस्थांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली. जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषणा झाल्यानंतर बुद्धगया परिसरातील जमिनीच्या किमती प्रचंड वाढल्या.भारतातील जमीन विषयक कायद्यांतर्गत परदेशी व्यक्तींना त्यांच्या नावाने जमीन खरेदी करता येत नाही. मात्र एन जी ओ.च्या नावाने जमीन खरेदीकरून त्यामध्ये ट्रस्टी राहता येते.या परिस्थितीचा फायदा घेऊन बौद्धांची लूट करण्याचे प्रकार हॉटेल्स, वाहतूकदार, खोट्या एन जी ओ चालविणारे यांच्याकडून होऊ लागले. यामुळे परदेशी बौद्ध संस्थांनी स्वतच्या देशातून येणाऱया बौद्ध पर्यटकांना राहण्यासाठी व इतर सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मठ, विहारे, धर्मशाळा, धम्म प्रशिक्षण केंद्र, अतिथिगृहे बांधण्यास सुरुवात केली.आजमितीस बुद्धगया येथे परदेशी विहार,अतिथिगृहाची संख्या 56 आहे.यामध्ये पाहुण्यांना राहण्यास सर्व सोई सुविधांनी युक्त अशा सुमारे एक हजार खोल्यांची व्यवस्था आहे. तिबेटी निग्मा टेम्पलमध्ये 10,000 लोकांची झोपण्याची व्यवस्था आहे. दुसरीकडे गेल्या वीस वर्षात हिंदू व्यावसायिकांनी बुद्धगया येथे आलिशान हॉटेल्स बांधली आहेत. बुद्धगयेमध्ये एकूण 125 हॉटेल्स व खासगी अतिथिगृहे आहेत.खाजगी हॉटेलमालक व धार्मिक संस्थाचालक यांचे हितसंबंध परस्परविरोधी असल्यामुळे त्यांच्यामध्ये संघर्ष उभा झाला आहे.परदेशी मठ, विहारे.अतिथिगृहे धर्मादाय तत्वावर चालविण्यात येत असल्यामुळे त्यांना सरकारी करातून सूट मिळते. यामुळेया मठ, विहार,अतिथिगृहे यामध्ये किमान देणगी आकारून पर्यटकांना निवास व भोजन व्यवस्था करून दिली जाते.यामुळे बुद्धगयेला भेट देणारे बहुतांश बौद्ध पर्यटक आपापल्या देशाच्या विहारात, अतिथिगृहात वास्तव्य करतात. यामुळे स्थानिक हॉटेल चालकांना तोटा होतो अशी स्थानिक हॉटेल मालकांची तक्रार असते. यासाठी या हॉटेलमालकांनी बिहार सरकारकडे निवेदने देऊन,न्यायालयात दावे दाखल करून विदेशी विहार, मठ,धर्मशाळा यामध्ये पर्यटकांना राहू देण्यास बंदी करण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. त्याचप्रमाणे या संस्थानाही ऐषआराम कर, विक्रीकर लागू करावा यासाठी सरकारवर दडपण आणले जाते. यातूनच फेब्रुवारी 2002 मध्ये बिहार वीज मंडळाने कोणत्याही कारणाशिवाय 34 धार्मिक संस्थांचा वीज पुरवठा अनिश्चित काळासाठी खंडित केला होता. त्यानंतरही विविध विभागाचे छापे, पाणीपुरवठा बंद करणे,वीज पुरवठा तोडणे या प्रकारे या बौद्ध धार्मिक संस्थाना हैराण केले जाते.स्थानिक व्यावसायिक, हॉटेल मालक हिंदू व धार्मिक संस्था बौद्ध असल्याने या संघर्षाने धार्मिक विद्वेषाचे वळण घेतले आहे. हिंदू व्यावसायिक,हॉटेल मालकांतर्फे अनेकदा बौद्ध भिक्षु, बौद्ध संस्थाचे कर्मचारी यांच्याविरुद्ध खोट्या पोलीस तक्रारी केल्या जातात.स्थानिक पोलीस अधिकारी व न्यायिक अधिकारी यांना लाच देऊन बौद्ध भिखू ,बौद्ध संस्थांचे कर्मचारी यांना शिक्षा देण्याची भीती घातली जाते.नंतर आर्थिक देवाण-घेवाण करून तडजोड केली जाते.याबाबत न्यीन्ग्मा मोनेस्ट्रीचे उदाहरण अगदी बोलके आहे.न्यीन्ग्मा मोनेस्ट्री ने पैसे देऊन विकत घेतलेल्या जागेवर बांधकाम सुरु केले.बांधकाम अर्ध्यावर आल्यानंतर एका स्थानिक गुंडाने ही जागा आपल्या पूर्वजांची असल्याचा दावा केला.प्रकरण1996 मध्ये जिल्हा न्यायालयात गेले.सर्व कागदपत्रे न्यीन्ग्मा मोनेस्ट्री च्या बाजूने असूनही चार वर्षानंतर न्यायालयाने मोनेस्ट्री च्या विरुद्ध निकाल दिला.याविरुद्ध मोनेस्ट्री ने पाटणा उच्च न्यायालयात अपील केले.उच्च न्यायालयाने प्रकरण दाखल करून चार वर्षे तारखा दिल्या व त्यानंतर प्रकरण पुन्हा जिल्हा न्यायालयात पाठविले.तेथे पुन्हा दोन वर्षे प्रकरण प्रलंबित राहिले.दोन वर्षानंतर पूर्वीचा विरोधी निकाल देणाऱया न्यायाधीशाला पदोन्नती देऊन आणले गेले.त्यांनी प्रकरण आपसात मिटवून घेण्याचा सल्ला दिला.न्यीन्ग्मा मोनेस्ट्री च्या व्यवस्थापकांनी त्यास नकार दिल्याने त्याचे अपहरण करून त्यास मारहाण करण्यात आली व त्याच्याजवळची रक्कम हिसकावून घेण्यात आली.वरून त्याच्याविरुद्ध पोलिसात चोरीची तक्रार दाखल करण्यात आली.फौजदारी न्यायालयाने न्यीन्ग्मा मोनेस्ट्रीच्या व्यवस्थापकांला चोरीच्या प्रकरणात आरोपी ठरवून तुरुंगात पाठविले.शेवटी न्यीन्ग्मा मोनेस्ट्री चे मुख्य गुरुजी द्झोन्ग्सार रिन्पोचे यांनी सन 2006 मध्ये 40 लाख रुपये देऊन तडजोड केली व मोनेस्ट्रीचे बांधकाम केले.तिबेटी महायान पंथीय रूट इंस्टीस्ट्यूट या संस्थेवर कित्येक वेळा हल्ले करण्यात आले. संस्थेच्या वस्तू व रक्कमेच्या चोऱया करण्यात आल्या,चकमा बौद्धांचे धर्मगुरू भन्ते प्रियपाल यानाही स्थानिक हिंदू गुंडांनी जमीन प्रकरणात गोवले आहे.अनेक बौद्ध संस्थांनी यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून स्थानिक राजकारण्यांना नियमित प्रोटेक्शन मनी देणे सुरु केले आहे.एकंदरीत बुद्धगयेतील बौद्ध व स्थानिक हिंदू व्यावसायिक,त्यांना सरंक्षण देणारे राजकीय नेते,सरकारी अधिकारी या दोन गटामध्ये कायमस्वरूपी सुप्त संघर्ष सुरु आहे.

No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Welcom

Website counter

Census 2010

Followers

Blog Archive

Contributors